शाळेतील समस्याचा निपटारा करा; अन्यथा पदयात्रा
बुलडाणा (प्रतिनिधी), 04 - येथील उर्दु शाळेचे व्यवस्थापन वेगळे करून अतिरिक्त तुकडीवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, पिण्याच्या पाण्यासह शाळेत संगणक वर्ग सुरू करण्यात यावे, क्रीडा शिक्षकासह साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन व आंदोलन करण्यात आले. परंतु अद्यापही समस्यांचा निपटारा करण्यात आला नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेतील समस्याचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अन्यथा 4 मार्च रोजी ग्रामस्थांच्या वतीने धाड ते बुलडाणा पदयात्रा काढण्यात येईल, असा इशारा पालकांसह ग्रामस्थांनी 1 मार्च रोजी एका निवेदनाव्दारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कायर्कारी अधिकार्यांना दिला आहे.
अपसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उर्दु माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी शहरात उर्दु हायस्कुलची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या स्थितीत या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून या शाळेला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. शाळेत विद्यार्थ्यासाठी पाण्याची सुविधा नसून संगणक वर्ग देखील सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे या शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचीत राहावे लागत आहे. मागील वर्षी या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी रद्द करीत मुळ जागेवर जाण्याचा आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहे. या शाळेतील मुलभुत समस्यांचा निपटारा करण्यात यावा, या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देवून शोले स्टाईल आंदोलन सुध्दा करण्यात आले होते. त्यावेळी आश्वासना व्यतिरिक्त काहीच देण्यात आले नाही.
त्यामुळे सदर शाळेतील समस्यांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अन्यथा चार मार्च रोजी पालक व ग्रामस्थांच्या वतीने धाड ते बुलडाणा अशी पदयात्रा काढण्यात येईल, असा इशारा सरपंच रिजवान सौदागर, म. शफिक रफिक सेठ, खालीद खान तालीब खान, हाफीज मुक्तार खान, हाजी नईम खान वाजीद खान व म. मुस्ताक बिसमिल्ला सौदागर यांनी दिला आहे.