खंडाळा तालुक्यात वीज कोसळून तीन ऊसतोडणी कामगार महिला गंभीर
सातारा, 04 - खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गावच्या हद्दीत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून शरयू साखर कारखान्याच्या तीन महिला ऊस तोडणी कामगार गंभीर जखमी झाल्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गावच्या हद्दीत फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या तात्पुरत्या स्वरुपाची घरे करून राहिल्या आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास या परिसरात वादळीवारे व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री आठ वाजण्याच्या वीज कोसळून झोपडीबाहेर असणार्या मोना अश्रुबा झोडपे (वय 19), बबिता आश्रुबा झोडपे (वय 40), सविता नाना साळवे (वय 28 सर्व रा. भाटवड, ता. माजलगाव, जि. बीड) महिला भाजून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनिसंदीप भोसले व महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.