Breaking News

2 कोटी 66 लाख रुपयांच्या कामांमध्ये बदल

परभणी, 18 -  जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणार्‍या निधीतून जिल्हा परिषदेने यापूर्वी प्रस्तावित केलेल्या 2 कोटी 66 लाख रुपयांच्या कामांमध्ये बदल केला असून बदलेली ही कामे वेळेत पूर्ण होतील की नाही, या विषयी मात्र अनिश्तिता आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला 2015-16 या आर्थिक वर्षाकरीता 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर जि.प.तील सदस्यांनी अनेक कामे सूचविली होती. त्यातील 18 कामे बदलण्यात आली आहेत. त्यामध्ये झरी येथे 3 लाख रुपये खर्चून करण्यात येणारे स्मशानभूमीचे काम आता पिंपळा येथे होणार आहे. झरी येथीलच स्मशानभूमी रस्त्याचे 3 लाखांचे काम बदलून ते पिंपळा येथेच स्मशानभूमीसाठी तारेचे कुंपन बांधण्यासाठी केले जाणार आहे. जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील स्मशानभूमी शेडचे 3 लाखांचे काम बदलून आता याच गावात स्मशानभूमी रस्त्याचे काम केले जाणार आहे. गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा येथील स्मशानभूमी रस्त्याचे 3 लाखांचे काम बदलून ते आता बडवणी येथे केले जाणार आहे. पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील स्मशानभूमी रस्त्याचे 8 लाखांचे काम आता परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव येथे केले जाणार आहे. पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथीेल 4 लाख 50 हजार रुपयांचे स्मशानभूमी रस्त्याचे काम आता सोन्ना येथे केले जाणार आहे. मानवत तालुक्यातील इरळद येथील स्मशानभूमी शेडचे 3 लाखांचे काम बदलून आता येथेच रस्त्याचे काम केले जाणार आहे.
 परभणी तालुक्यातील ठोळा येथील स्मशानभूमी शेडचे 4 लाखांचे काम बदलून येथेच शेड व रस्ता या दोन टप्प्यात केले जाणार आहे. गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याचे 8 लाखांचे काम बदलून ते कासारवाडी येथे केले जाणार आहे. सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील स्मशानभूमी शेडचे काम बदलून ते कुंडी येथे केले जाणार आहे.
 जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके येथील स्मशानभूनी रस्त्याचे 3 लाखांचे काम बदलून ते आता कौसडी येथे केले जाणार आहे. जिंतूर तालुक्यातील मोळा येथील स्मशानभूमी शेडचे 2 लाख 50 हजार रुपयांच्या शेडचे काम जोगवाडा येथे केले जाणार आहे. सेलू तालुक्यातील सिंगठाणा येथील 3 लाखांचे शेडचे काम बदलून ते पालम तालुक्यातील रामापूर येथे केले जाणार आहे. कुपटा येथील तीन लाखांचे शेडचे काम बदलून ते कान्हड येथे केले जाणार आहे.