जिल्हा रुग्णालयात अर्भक गायब; ठिय्या आंदोलन
अहमदनगर । प्रतिनिधी । 09 - जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन दिवसांच्या बाळाचा रविवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उचलून नेण्यात आला. मात्र शवविच्छेदन करण्यापूर्वीच मृतदेह पीएम रुममधून गायब झाला. या प्रकाराने बाळाचे नातेवाईक चांगलेच संतप्त झाले असून या प्रकरणी तोफखाना पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कर्जत तालुक्यातील सरिता गणेश भांडवलकर (रा. आखोणी) या महिलेला प्रसूतीसाठी आधी कर्जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील प्रशासनाने प्रसूतीसाठी महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार सरिता या गुरुवारी (दि.4) रात्री 9.30 वाजता जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागात दाखल झाल्या. शुक्रवारी (दि.5) पहाटे पाच वाजता त्यांची प्रसूती होवून पुरुष जातीच्या बाळाचा जन्म झाला.
शनिवारी रात्री बाळ तापाने फणफणले. याबाबत नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांना सांगितले. मात्र, सकाळी पाहू, असे त्यांना उत्तर मिळाले. रविवारी सकाळी सदर बाळ मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर महिलेचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. बाळाचे शवविच्छेदन करायचे आहे, असे सांगून मृतदेह पीएम रुममध्ये नेण्यात आला. तेथे आधीच पाच ते सहा मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू होते. त्यामुळे नातेवाईक ताटकळत बसले होते. नातेवाईकांनी चौकशी केली असता बाळाचा मृतदेह आणला होता. मात्र, तो सध्या इथे नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. दरम्यान माजी नगरसेवक निखिल वारे, राष्ट्रवादीचे अभिजीत खोसे, ओंकार देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारत जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले.
रविवारी सायंकाळी उशिरा बाळाच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेची फिर्याद दाखल करताना कोणते कलम लावावे, यावर पोलिसांचा बराच वेळखल सुरु होता.