पशुपालकांचे 75 गटात प्रत्येक बुधवारी मेळावे
अहमदनगर । प्रतिनिधी । 09 - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने दर बुधवारी जि. प. गटातील प्रमुख गावात पशुपालकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी शेतकरी व पशुपालकांना विविध पद्धतीने चारा उत्पादनाचा डेमो देण्यात येणार आहे. यासह संकरित सुदृढ वासरांच्या मालकांना रोख स्वरुपात पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पशुपालकांचा दर बुधवारी मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भारत राठोड यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटातील सदस्यांना विश्वासात घेवून त्या गटात असणार्या चार ते पाच गावात दर बुधवारी हा मेळावा होणार आहे.
या शेतकर्यांना अजोला, मूरघास, हॉड्रोफोनिक, निकृष्ट चारा सकस करणे, चारा उत्पादन वाढण्याचे प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शेतकर्यांना टंचाई काळात कशा पद्धतीने जास्तीत जास्त सकस चारा जनावरांसाठी उपलब्ध होईल, याचा अंदाज येणार आहे. जिल्ह्यात साधारणपणे दोन लाख संकरित वासरे आहेत. मेळाव्यात यापैकी सुदृढ असणार्या वासरांच्या मालकांचा रोख स्वरुपात बक्षीस देवून गौरव करण्यात येणार आहे. गेल्या बुधवारपासून पशुपालक आणि शेतकर्यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात सध्या 30 एप्रिलपर्यंत पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. त्यानंतर उसाचा वापर चारा म्हणून करता येणार आहे. साधारणपणे जिल्ह्यात 1 लाख 13 हजार हेक्टरवर उसाचे पीक असून त्याद्वारे उन्हाळ्यात चारा टंचाईवर मात करता येईल, अशी आशा पशुसंवर्धन विभागाला आहे. पशुसंवर्धन विभागाने शेतकर्यांना प्रत्येकी दहा किलोप्रमाणे 50 लाख रुपयांचे मका बियाणे वाटप केलेले आहे. एवढयाच बियाण्याचे पुन्हा वाटप होणार आहे.