Breaking News

सचिनकडून बीडच्या दुष्काळाची दखल

बीड, 21 -  दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला बसला आहे. याची दखल क्रिकेटचा देव, खासदार सचिन तेंडुलकरने घेतली असून त्याने शनिवारी आपल्या स्वीय सहाय्यकाला बीडच्या दुष्काळी झळा जाणून घेण्यासाठी पाठवले. 
 सचिनच्या स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांनी बीडच्या जिल्हाधिका-यासह वरिष्ठ अधिका-याची भेट घेऊन या भागातील जनतेला मदत करण्याबाबत चाचपणी केली. बीड जिल्ह्याला दर चार-दोन वर्षांनी दुष्काळाला तोंड द्यावे लागते. यंदा तर सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यासमोर दुष्काळ उभा ठाकला आहे. अशा सततच्या दुष्काळी झळांमुळे जिल्ह्यातील कृषक समाज अडचणीत येत आहे. नारायण कन्हान यांनी बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. जिल्ह्यातील दुष्काळाची माहिती घेऊन दुष्काळी भागात काय मदत करता येईल, यासंदर्भात चाचपणी केली. 
सचिनचे स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांना जिल्ह्यातील दुष्काळाच्या तीव्रतेच्या स्थिती विषयी माहिती घेतली. पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची यादी यावेळी त्यांना देण्यात आली. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या या दुष्काळामुळे प्रभावित झाली आहे. पिण्याला पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा पुरवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. सध्या दीड लाखाच्या जवळपास जनावरे एकशेसाठच्या जवळ सुरु असणार्‍या छावण्यात सांभाळली जात आहेत.