Breaking News

नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उद्योगनगरीला भेट

 पिंपरी (प्रतिनिधी)। 13 - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची व कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी नेहरु युवा केंद्र संघटनेच्यावतीने आलेल्या ओडिशा व झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त भागातील 250 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड या उद्योग नगरीला भेट दिली . यावेळी त्यांचे स्वागत महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आज केले.
या पथकाने चिंचवड येथील सायन्स पार्क व ऑटो क्लस्टर येथे भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच पिंपरी येथील एच.ए. मैदानावर आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेलाही त्यांनी भेट दिली. यावेळी सी आर पी एफ चे डेप्युटी कमांड सचिन गायकवाड, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे तसेच किशोर केदारी आदी उपस्थित होते. 
या पथकामध्ये ओडिशा व झारखंड राज्यांमधील विविध शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नेतृत्व नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, वैशाली रणधीर व हितेंद्र वैद्य यांनी केले. ओडिशा व झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गटप्रमुख म्हणून आर विजयकुमार, रंजना शर्मा, नागेंद्रकुमार सिंग, एस.के.तिवारी, रिता पोरजा, जिना अहमद, एम शिवाप्पा, एस.के.चव्हाण यांनी काम पाहिले. या विद्यार्थांच्या समवेत तळेगाव येथील 20 केंद्रीय सुरक्षादल जवानही उपस्थित होते. नक्षलवाद हटविण्यासाठी सीआरपीएफच्या जवनांनी आणि नेहरू युवा केंद्राच्या अधिकार्‍यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा हा दौरा नियोजित केला होता. यामध्ये विज्ञान विषयक माहिती आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.