Breaking News

महापौर बदलाचा निर्णय मला योग्य वाटेल तेव्हा घेईन - अजित पवार

 पिंपरी (प्रतिनिधी)। 13 - पिंपरी-चिंचवड महापौर बदलाचा निर्णय हा पक्षांतर्गत निर्णय असून मला व पक्षाला योग्य वाटेल तेव्हाच महापौर बदल केला जाईल असा निर्वाळा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पत्रकांराशी बोलताना केला.
पिंपरी येथील एच.ए. मैदानावर आयोजित आठव्या पवनाथडी जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, महापालिका आयुक्त राजीव जाधव, आमदार महेश लांडगे, सत्ताधारी पक्षनेत्या मंगला कदम, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते अझम पानसरे, राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्षा सुजाता पालांडे, मनसेचे नगरसेवक अनंत को-हाळे, विरोधी पक्षनेते राहुल भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी सिंचन घोटाळा प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, सिंचन प्रकल्पाबाबत चौकशी होत असेल तर ती योग्य आहे कारण यामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तो जनतेसमोर येणे गरजेचे आहे. मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. याकाळात बांधलेले सर्व प्रकल्प मराठवाडा व विदर्भात बांधलेले गेले आहेत. त्यातला एकही प्रकल्प पश्‍चिम महाराष्ट्रात बांधलेला नाही. त्यामुळे चौकशी समितीने त्याची कसून चौकशी करावी. त्यात जर खरेच भ्रष्टाचार होत असेल तर तो बाहेर आणावा. मी त्याचं स्वागत करेन. तसेच चौकशी नंतर चित्र स्पष्ट होईलच. मी बोलत नाही म्हणूनच माध्यमे माझ्या विरोधी एकच बाजू दाखवत असतात. मी ही गेल्या 15 वर्षापासून राजकारणात आहे. मी आत्ता काही बोलणारही नाही. माझी भूमिका मी निवडणूक काळात योग्य वेळी दाखवेन, कारण मी फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. पिंपरी-चिंचवड शहरावर दादांचा आश्‍वासनांचा पाऊस शहरात बीआरटी तर सुरु केलीच मात्र त्या बरोबरच मेट्रो, मोनो व ट्राम ही सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच एनयुटीपी (नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी) योजनेद्वारे जसे मुंबईमध्ये विकास कामे चालू आहेत त्या प्रमाणेच पीयुटीपी योजना चालू करून शहरातही वाहतूक व्यवस्था सुधारणार आहोत.
तसेच शहरात 24 द 7 पाणी पुरवठा सुरू व्हावा यासाठी पुढील वर्षी आंध्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलणार आहोत. तसेच भामा-आस्खेड धरणातील पाणीही आपण घेणार आहोत. तसेच शहरात येत्या तीन वर्षात एलइडी दिवे लावले जातील व सर्वत्र सीसीटीव्ही ही लावले जातील. त्यामुळे शहरातील वाहतूक, पाणी, सुरक्षा यासाठी बरेच प्रकल्प राबविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे आश्‍वासन अजित पवार यांनी उद्घाटन प्रसंगी 

बोलताना दिले.