Breaking News

विद्यार्थ्यांवरील देशद्रोहाचा आरोप मागे घ्या! ; जेएनयू विद्यापीठ प्राध्यापक संघटनेची मागणी

दिल्ली, दि.22 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या परिसरात दिल्ली पोलिसांना प्रवेशास परवानगी न देण्याची मागणी (जेएनयू) प्राध्यापक संघटनेने सोमवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली. तसेच  उमर खालिदसह इतर विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप मागे घेतला गेलाच पाहिजे, अशी मागणी प्राध्यापक संघटनेने कुलगुरूंकडे व्यक्त केला. 
केवळ एका व्हिडिओच्या आधारे विद्यार्थ्यांवर देशद्रोह आणि गुन्हेगारी कटाचा आरोप लावता येऊ शकत नाही, अशी माहिती कायदेतज्ज्ञांनी दिली असल्याचे शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यासोबतच सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या अंतर्गत समितीत बदल करण्याची गरज असल्याचाही सल्ला शिक्षक संघटनेने कुलगुरूंना दिला. विद्यापीठात सकारात्मक वातावरण तयार होण्याची गरज आहे. तेव्हाच विद्यार्थी विद्यापीठाच्या अंतर्गत समितीच्या चौकशीला सामोरे जातील, असेही शिक्षक संघटनेकडून सांगण्यात आले आहे. तसेच दिल्ली पोलिसांना विद्यापीठात प्रवेश द्यावा की नाही हा पूर्णपणे कुलगुरूंचा अधिकार आहे. त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, असेही ती पुढे म्हणाली.
मी मुस्लिम आहे, दहशतवादी नाही ः खालिद
नवी दिल्ली ः मागील सात वर्षांपासून जेएनयू कॅम्पसमध्ये वावरत असताना कधीही मला मी मुस्लिम असल्याचे जाणवले नाही. मात्र मागील काही दिवसांत मला मी मुस्लिम असल्याचे वाटू लागले आहे. मी मुस्लिम आहे पण दहशतवादी नाही असे जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेला उमर खालिद म्हणाला. मागच्या काही दिवसांपासून फरार असलेला उमर खालिद आणि अन्य पाच आरोपी रविवारी रात्री जेएनयूमध्ये दाखल झाले. देशविरोधी घोषणाबाजीनंतर सरकारने कारवाई सुरु केल्यानंतर उमर खालिद फरार झाला होता. 
संशयित आरोपींना आपल्या ताब्यात द्या!
जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारी रोजी देशदविरोधी नारे दिल्याचा आरोप असलेले पाच विद्यार्थी रविवारी सायंकाळी विद्यापीठात परत आले. यात उमर खालीदचाही समावेश आहे. दरम्यान, उमर खालीदने यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर सर्व पाचही संशयित आरोपींना आपल्या ताब्यात द्यावे, अशी विनंती पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला केली. एवढेच नाही तर बराच वेळ पोलिस विद्यापीठ परिसरात थांबले. मात्र, त्यांना आत जाण्याची परवानगी नसल्याने या पाच जणांना अटक न करताच ते परत गेले.