पाकवर विश्वास ठेवणे शक्य नाही ः संरक्षणमंत्री
नवी दिल्ली, दि.22 - पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केल्याने पाकिस्तानवर विश्वास ठेवणे शक्य नाही. हा देश आपल्या दहशतवादी कारवायांपासून कधीच बाहेर येणार नसल्यामुळे आता आम्हीही शांत राहणार नाही. पाकला कायमची अद्दल घडविणे, एवढाच पर्याय आमच्यापुढे उरला आहे, असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी दिला.
सातत्याने भारतविरोधी कारवाया पाककडून सुरू असल्याने या देशासोबत शांततेच्या मुद्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी कोणतीही चर्चा सुरू करण्यापूर्वी पाकला स्वत:चा प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार आहे, असे सांगताना पर्रिकर यांनी पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा आमचा मार्ग मोकळा असल्याचेही संकेत दिले. अमेरिकेने अल् कायद्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार करण्यापूर्वी पाकला कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती, त्याचप्रमाणे आम्हीही पाकला पूर्वसूचना न देता या देशातील अतिरेक्यांना प्रशिक्षण देणार्या तळांवर तसेच अतिरेकी म्होरक्यांवर हल्ला करणार आहोत.
वेळ आणि जागा याबाबतची निवड आम्ही आपल्या आवडीनुसार करू, असे पर्रिकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधून आपले जवान माघारी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाकवर विश्वास ठेवणे आता अशक्य आहे. जशाच तसे उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, असे पर्रिकर म्हणाले.