Breaking News

सिल्लोडमध्ये तलाठ्यावर वाळू चोरांचा हल्ला

सिल्लोड, 22 - पूर्णा नदीपात्रात धानोरा (ता. सिल्लोड) शिवारात वाळूचोरी पकडल्यामुळे वाळू चोरांनी तलाठी महेश बडके यांच्यावर हल्ला चढवीत त्यांना बेदम मारहाण केली. रविवारी सकाळी घडलेल्या या प्रकारात तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. 
पूर्णा नदीच्या पात्रात सुरू असलेली बेसुमार वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल यंत्रणेने पथके तैनात केली आहेत. त्याचा भाग म्हणून तलाठी बडके आणि पालोदचे तलाठी विष्णू सोनवणे धानोरा गावी गेले. तेव्हा नदीपात्रात दोन ट्रॅक्टर वाळूचोरी करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना हटकले असता ट्रॅक्टरचालक व टोळीने तलाठी बडके यांच्याशी वाद घातला. त्यांनी लगेच तहसीलदार संतोष गोरड यांना ही माहिती दिली. तहसीलदारांनी आपल्या गाडीतून काही कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठविले. तोवर या टोळीने बडके यांच्याशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली होती. तहसीलदारांची गाडी पाहताच वाळूचोरांनी दगडफेक सुरू केली.