Breaking News

दुष्काळग्रस्तांना मदतीचा सचिन तेंडुलकरचा विचार

बीड, 22 - क्रिकेटच्या खेळपट्टीवर दिग्गज गोलंदाजांना धडकी भरविणारा, क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावण्याची शक्यता आहे. प्राथमिक चाचपणीसाठी भारतरत्न सचिन यांनी शनिवारी  स्वीय सहायकाला येथे पाठविले. 
स्वीय सहायकाने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून दुष्काळीस्थिती व उपाययोजनांची माहिती घेतली. मास्टर-ब्लास्टर‘ जिल्ह्याला नेमकी कोणती मदत करणार, याबाबत प्रशासनातच उत्सुकता निर्माण झाली आहे. 
तेंडुलकर यांचे स्वीय सहायक नारायण कन्नान आज बीडला आले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची त्यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळीस्थितीवर चर्चा केली, माहिती घेतली. ग्रामीण भागातील सोयी-सुविधांचाही मागोवा घेतला. जिल्ह्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांची यादीही मागितली. ग्रामीण भागांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असून, त्या उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यास इच्छुक असल्याचे कन्नान यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. दुष्काळी उपाययोजना करताना किंवा ग्रामीण भागात सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना सर्व स्तरांतून सहकार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त करून कन्नान यांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरणाचीही चाचपणी केली.