Breaking News

बॅक वॉटर योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया

बीड, 22 - बार्शी रोडवरील मुक्ता लॉन्सजवळून गेलेली माजलगाव बॅक वॉटर योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाणीटंचाईच्या काळातही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे बीडकरांची तहान भागविण्यासाठी कसरत सुरू असताना दोन दिवसांपासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही पालिकेला याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले. 
सध्या शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. बार्शी रोडवरील मुक्ता लॉन्सच्या बाजूने माजलगाव बॅक वॉटरची मुख्य जलवाहिनी गेली आहे. ही जलवाहिनी दोन दिवसांपूर्वी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीजवळ दगड असल्याने अज्ञात व्यक्तीने ही जलवाहिनी फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. जलवाहिनीतून तीन ते चार इंची पाणी दोन दिवसांपासून मोठ्या नाल्यातून वाहून जात आहे. टंचाईमुळे एकीकडे शहराला आठ आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून बीडकरांना काटकसरीने पाणी वापरावे लागते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नगरपालिकेला याबाबत गांभीर्य नाही का असा सवाल नागरिकांनी केला आहे. शहरातील इतर भागातही काही ठिकाणी व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.