Breaking News

स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या जीवनमूल्यांचा अंगीकार केला पाहिजे - प्राचार्य देशमुख

देवळा/प्रतिनिधी। 17 -  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय हे मूल्य खर्‍या अर्थाने जीवनमूल्य आहेत. त्यांचा अंगीकार समाजातील सर्व घटकांनी केला पाहिजे. असे प्रतिपादन नाशिक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनी आज येथे केले.
 शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक यांच्यावतीने नाशिक जिल्हयात विविध महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे. देवळा येथील कर्मवीर 
रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक विचार या विषयावर प्रमुख पाहूणे ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्य श्री.बी.जे.बच्छाव व व्याख्यात्या ड.मनस्वी तायडे हे उपस्थित होते.  श्री.देशमुख म्हणाले, समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्याय मिळावा.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धोरण होते.  विदयार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे ज्ञान, कौशल्य, आणि अभिवृत्तीची साधना करावी.  सतत ध्येयाप्रती महत्वाकांक्षी राहून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी. विद्यार्थ्यांनी नशिबावर विसबून न राहता कष्टाला महत्व द्यावे. ह्या डॉ.बाबासाहेब  आंबडेकरांचे विचारांची अंमलबजावणी करावी.
 अ‍ॅड . मनस्वी तायडे म्हणाल्या, चातुर्वण्य व्यवस्थेने जातीभेद, लिंगभेद निर्माण झाले. आपल्याला सामाजिक समतेचे तत्व स्वीकार केले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या प्रजजनांमध्ये पन्नास टक्के आरक्षण धोरण आणले, राबविले. पिडीत-शोषितांच्या उन्नयनासाठी सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. सामाजिक न्याय,समता व बंधुता या मूल्यांची जपवणूक करणारे भारतीय संविधान हीच आपल्या जगण्याची व वागण्याची जीवनपध्दती असली पाहिजे. समाज कल्याण निरीक्षक श्री.एस.एस.क्षत्रिय यांनी ही आपले अनमोल विचार विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर सेवक,व सर्व विभागांचे बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते. प्रा.डॉ.जयवंत भदाणे यांनी आभार मानले.