भगवान ऋषभदेव यांचे कार्य आजही मार्गदर्शक
नाशिक/प्रतिनिधी। 17 - जैन समाजातील सर्व तीर्थंकरांसह भगवान ऋषभदेव यांचे कार्य मोलाचे आहे. भगवान ऋषभदेव यांनी सर्वांनाच विकासाची समान संधी दिली. त्यांचे कार्य देशातील सर्व स्तरावरील शासकांना मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मांगीतुंगी येथे 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार राजेंद्र पाटणी, दीपिका चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नाशिक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, माजी खासदार जे. के. जैन, श्री ज्ञानमती माताजी, चंदनामाताजी, रवींद्रकीर्ती स्वामी, अनेकांतसागर महाराज, डॉ. पन्नालाल पापडीवाल, संजय पापडीवाल, सुमेर काले, भूषण कासलीवाल, वर्धमान पांडे, जीवनप्रकाश जैन,
चंद्रशेखर कासलीवाल, सुवर्णा काले आदी यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, की मांगीतुंगीसारख्या सुंदर परिसराच्या विकासासाठी 275 कोटीचा बृहद आराखडा तयार केला आहे. महामस्तकाभिषेक सेाहळ्याच्या निमित्ताने 40 कोटीची विकासकामे तातडीने हाती घेण्यात आली. मांगीतुंगी परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक लढाई याच भागात झाली आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी शासनस्तरावर सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, भगवान ऋषभदेव धन्वंतरी, शासक, साहित्य, कला आदी सर्व क्षेत्रासाठी आदर्श आहेत. त्यांच्या काळात सर्वांना विकासाची समान संधी होती. आपल्या प्रजेचे पालनपोषण कशाप्रकारे करावे, याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला आहे. उच्चपदस्थांपासून गावातील सरपंचापर्यंत सर्वांना भगवान ऋषभदेवांच्या जीवनातून शिक्षा आणि दीक्षा घेण्यासारखी आहे, असे ते म्हणाले. जैन समाजाने भौतिक विकासाबरोबर दातृत्वाला महत्व दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, श्रद्धा असलेल्या समाजाचे अस्तित्व कुणीही नष्ट करू शकत नाही. जगातल्या अनेक संस्कृती नष्ट पावल्या. मात्र भारतीय संस्कृतीने श्रद्धेला महत्व दिल्यानेच तिचा सातत्याने उत्कर्ष जैन, बौद्ध, हिंदू धर्माने पर्यावरण आणि अहिंसेसोबत जगण्याचा मार्ग दाखविला. या संस्कृतीने जगाच्या रचनेला समजून घेण्याचे संस्कार केल्याने ती कायम आहे, असे त्यांनी सांगितले. काळाच्या ओघात कालबाह्य ठरणार्या प्रथांना आपल्या संस्कृतीने बाजूला सारले, हाच सांस्कृतिक विकासाचा खरा मार्ग असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री महोदयांनी भयाळे (ता. चांदवड) येथील शहीद जवान शंकर शिंदे यांना आदरांजली वाहिली.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, अहिंसेचा संदेश देवून जैन समाजाने सांस्कृतिक मुल्यांची सर्वोच्च स्थानी प्रतिष्ठापना केली आहे. भगवान ऋषभदेवांची 108 फुटी मूर्ती त्याचेच प्रतिक आहे. जैन साधू कठोर तपश्चर्या करताना समाजाच्या हितासाठी उपदेश देतात. मांगीतुंगी येथून हा संदेश जगभर जाईल, असे त्यांनी सांगितले. मांगीतुंगी च्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्रामविकास विभागातर्फे 19 कोटींच्या पायाभूत सुविधा पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मांगीतुंगी सोहळ्याच्या विकासाचे कार्य वेगाने करण्यात आले, असे सांगितले.यावेळी खासदार भामरे यांनी मांगीतुंगीचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्ञानमती माताजी, श्री रवींद्रकीर्ति स्वामी, श्री.जैन यांनी आपल्या भाषणात शासन व प्रशासनाने केवळ दोन महिन्यात चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुषण कासलिवाल आणि मूर्तीचे शिल्पकार सी.आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त डवले आणि जिल्हाधिकारी कुशवाह यांच्यासह प्रशासनातील अधिकार्यांनी कुंभमेळा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या आयोजनात उत्तम कार्य केल्याचा आवर्जुन उल्लेख केला.मुख्यमंत्री महोदयांचे सकाळी सव्वादहाच्या सुमारास मांगीतुंगी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांचे राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आयुक्त श्री. डवले, जिल्हाधिकारी कुशवाह यांनी स्वागत केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी हेलिकॉप्टरमधून 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीची पाहणी केली.