आम्ही सुध्दा गुन्हे दाखल करणार : ढवण
अहमदनगर । प्रतिनिधी । 17 - नगरसेवकांच्या पत्राची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. प्रभागात विकास कामे होत नाहीत. मोर्चेकरी शिष्टमंडळासोबत चर्चेची तयारी प्रशासनाकडून दाखविली जात नाही. त्यामुळेच आंदोलनादरम्यान परिस्थिती बिघडली. त्याला प्रशासन व सत्ताधारी जबाबदार आहेत. प्रशासनाने गुन्हे दाखल करून चुकीचा पायंडा पाडला. आम्हीही न्यायमार्गाने प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा नगरसेविका शारदा ढवण यांनी केला आहे.
प्रभागातील प्रलंबित विकास कामांसाठी नगरसेविका शारदा ढवण, त्यांचे पती सेनेचे उपशहरप्रमुख दिगंबर ढवण यांनी 9 तारखेला महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चाचे रुपांतर महापालिकेत आयुक्तांच्या दालनात बैठा सत्याग्रह करून झाले. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या वागणुकीबाबत ढवण यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात कामे करण्याबाबत त्रास दिला जातो. नगरसेवकाच्या पत्राची दखल प्रशासन घेत नाहीत. नगरसेवकावर गुन्हे दाखल करून प्रशासनाने काय साध्य केले. विकास कामे केली तर मोर्चे काढण्याची वेळ येणार नाही. नागरिकांच्या समस्या सुटाव्यात, याच हेतूने मोर्चा काढल्याचे ढवण यांनी सांगितले.