Breaking News

पत्नीसह दोन मुलींची निघृण हत्या करणार्‍या आरोपीला फाशी

 अहमदनगर । प्रतिनिधी । 17 - मुलगा होत नाही, दोन मुलीच झाल्या, या कारणावरुन झोपेत असलेल्या पत्नीसह दोन मुलींची निघृण हत्या केल्याच्या आरोपावरुन नगर तालुक्यातील डोंगरगण येथील आरोपी गणेश मारुती भुतकर (वय 31) याला येथील तर्द्थ जिल्हा न्यायाधिश श्रीमती.आर.व्ही.सावंत-वाघुले यांनी आरोपीस दोषी धरुन भादवी 302 नुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच भादवी 498 अ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 5 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले.या निकालामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या निकालाचे अनेक महिलांनी स्वागत केले. 
अनिता गणेश भुतकर (वय 26), ज्ञानेश्‍वरी (वय 5), संजीवनी (वय 3) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत. घटनेची थोडक्यात हकिकत अशी, राहुरी तालुक्यातील उंबरे येथील भास्कर बापू तांबे यांची मुलगी मयत अनिता हिचा विवाह आरोपी गणेश भुतकर याच्याशी 14 डिसेंबर 2005 रोजी झाला होता. लग्नानंतर अनिता हिस तिचे सासरी (डोंगरगण) सासू लक्ष्मीबाई मारुती भतकतर व पती गणेश मारुती भुतकर यांनी काही दिवस चांगले नांदविले. परंतु त्यानंतर मुलीस तुझे माहेरुन दुचाकी घेण्यासाठी व शेतीच्या भांडवलासाठी 1 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करुन उपाशी पोटी ठेवले. त्यामुळे तांबे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मुलीच्या भवितव्याचा विचार करुन तडजोड करुन पुन्हा अनिता ही सासरी नांदवयास गेली, त्यानंतर मयत अनितास ज्ञानेश्‍वरी व संजीवणी अशा दोन मुली झाल्या. त्यानंतर आरोपी हे सतत कुरापत काढून मयत अनितास त्रास देत होते. घटनेपुर्वी साधारणत: 1 वर्षापासून अनिता हिस पती गणेश भुतकर व सासू लक्ष्मीबाई हे कर्ज फेडण्यासाठी पैसे घेऊन ये नाहीतर तुला आम्ही जगू देणार नाही. असे म्हणून छळ करीत होते. मयत अनिताच्या घरच्यांनी तिचा पती गणेश व सासू लक्ष्मीबाई यांना समजावून सांगितले व 50 हजार रुपये दिले. परंतु आरोपींची मागणी कमी होत नव्हती. त्यातच मुलगा झाला नाही म्हणून तिचा वेळोवेळी छळ करीत होते.
8 नोव्हेंबर 2013 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी गणेश भुतकर याने अनिताच्या घरच्यांकडून पैशांची मागणी पुर्ण होत नाही तसेच दोन्हीही मुली झाल्या, या कारणावरुन अनिता व दोन मुली या झोपेतच गळा आवळून निघृण हत्या केली. त्यानंतर आरोपीने शांत डोक्याने डोंगरगणचे पोलिस पाटील मते यांना फोन करुन पोलिसांना बोलावून घ्या. असा निरोप दिला. पहाटेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे चंद्रशेखर सावंत कर्मचार्‍यांसह घटनास्थळी आले. याप्रकरणी आरोपी गणेशला पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक दाखविली. व  शारिरीक छळ केल्याच्या आरोपावरुन आरोपीची आई लक्ष्मीबाई यांनाही अटक केली. या घटनेची फिर्याद मयत अनिताचा भाऊ देविदास भास्कर तांबे यांनी दिली होती. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटला चालू होण्यापुर्वीच आरोपी भुतकर ही मयत झाली. खटल्या दरम्यान सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एस.गायकवाड, तपासी अधिकारी चंद्रशेखर सावंत व फिर्यादी यांचे जबाब महत्वपुर्ण ठरले. मयतांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. सरकारी पक्षाचा आलेला पुरावा व परिस्थितीजन्य पुरावा, सरकार पक्षाचा युक्त
ीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने 10 फेब्रुवारी 2016 रोजी आरोपींना दोषी धरले, त्यानंतर आरोपीच्या शिक्षेबाबत 11 फेब्रुवारी रोजी युक्तीवाद केला त्यामध्ये आरोपीने केलेले कृत्य अतिशय क्रुर असुन फक्त मुलाच्या हवाश्यापोटी व पैशाच्या मागणीसाठी पत्नी, व दोन मुलीचा गळा दाबून निघृणपणे खून केला असल्यामुळे आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी असा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील पाटील यांनी केला. तसेच त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडेही न्यायालयास सादर केले. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस वरील शिक्षा ठोठावली. 
दरम्यान, आरोपींना फाशी होण्याची ही दुसरी घटना आहे. 14 फेब्रुवारी 2005 मध्ये पारनेर तालुक्यातील हिवरेकोर्डा येथील तिहेरी हत्याकांडात आरोपीला फाशीची शिक्षा नगर न्यायालयात झाली होती. त्यावेळी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. सतीश पाटील यांनीच काम पाहिले होते.