Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दहा ते पंधरा वर्षांपासून पाणीपट्टीची थकबाकी

नांदेड, 10 - शहरी भागांना पाणीपुरवठा करणार्‍या जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मागील दहा ते पंधरा वर्षांपासून पाणीपट्टीची थकबाकी भरली जात नाही. परिणामी थकबाकीची रक्कम ही नव्वद कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. 
यात जिल्हा परिषदकडे 61 कोटी, तर महापालिकेकडे 17 कोटी थकबाकी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजना तयार केल्या आहेत. संबंधित योजनेचे पाणी शहरी भागाला पुरवठा करताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपट्टीची रक्कम भरणे क्रमप्राप्त असते; मात्र महापालिका असो किंवा जिल्हा परिषदकडून वारेमाप पाणी उचलले जात आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणीपट्टीची रक्कम भरण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्जाचा बोजाही दिवसेंदिवस 
वाढत चालला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून नांदेड वाघाळ महापालिका, जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था, किनवट नगरपरिषद, धर्माबाद नगर परिषद, देगलूर नगरपरिषद, गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय, माहूरगड, लोहा नगरपरिषद, कंधार नगरपरिषद व धनेगाव ग्रामपंचायत अशा अकरा संस्थांना पाणीपुरवठा केला जातो.