स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठासमोर आंदोलकांवर लाठीमार
नवीन नांदेड, 10 - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंटस ऍण्ड युथ फ्रंट (नसोसवायएफ) या संघटनेच्या वतीने दुपारी तीन वाजता आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीत आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून लाठीमार सहन करावा लागला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन हे सध्या नेहमीचेच समीकरण झाले असून दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावर आंदोलन सुरू आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी नसोसवायएफ संघटनेतर्फे सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. परंतु यादरम्यान कुठलीही हाक प्रशासनापर्यंत पोचत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनात हर्षवर्धन दवणे, धम्मपाल वाढवे, सचिन येडके, प्रदीप भिसे, बालाजी कोंडामंगल, संघरत्न निवडुंगे आदींसह पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. विद्यापीठात सर्व सोयीयुक्त अशा मध्यवर्ती ठिकाणी ग्रंथालय इमारत उभी झालेली आहे. ही इमारत म्हणजे विद्यापीठाच्या वैभवात भर घालणारी आहे. दरम्यान, या ग्रंथालयास विविध संघटनांकडून विविध नावे देण्याची मागणी होत आहे.