व्यवस्था परिवर्तन करण्यात यशस्वी झालो नाही - राजू शेट्टी
परभणी, 10 - काँग्रेस सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला संपविण्यासाठी आम्ही भाजपला मदत केली. परंतु, भाजपने सत्तेत बसण्यासाठी आमचा शिडीसारखा वापर करून घेतला. आम्ही सत्ता परिवर्तन करण्यात यशस्वी झालो मात्र, व्यवस्था परिवर्तन करण्यात यशस्वी झालो नाही, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राज शेट्टी यांनी मंगळवारी व्यक्त केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शेंद्रा (ता. परभणी) येथे आज झालेल्या प्रकल्पग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या हक्क परिषदेसाठी शेट्टी येथे आले होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुष्काळी अंशदानाचा पत्ता नाही. विम्याचा प्रश्नही
अधांतरीच आहे. या भागात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतच आहे. शेती व शेतकर्यांची स्थिती गंभीर आहे. आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला मात्र, सिंचन झाले नाही. त्यातून त्यांनी स्वार्थ साधला. योग्य नियोजन झाले असते तर, सध्या इतकी भयाण स्थिती झाली नसती. आमचा सरकारला पाठिंबा असला तरी, आम्ही त्यांच्या निर्णय प्रक्रियेत नाही, असे स्पष्ट करून सिंचन गैरव्यवहाराशी संबंधितांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.