Breaking News

आधी गळती काढा नंतर पाणी कपातीचे बघा : आ. भोसले

सातारा, 16 - पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरु झाल्याने कास धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पाणी कपात अटळ असली तरीही पाणी पुरवठा विभागाने आधी शहरातील जलवाहिन्यांची गळती काढून पाणी बचत करावी, अशी सक्त सुचना आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणीपुरवठा सभापतींसह पाणीपुरवठा विभागाला केली आहे. 
पर्जन्यमान कमी झाल्याने सर्वत्रच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आता फेब्रुवारी महिना चालू असून कास धरणाची पाणी पातळी खालावली आहे. सहाजीकच सातारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसासाठी अजून चार-पाच महिने अवधी असल्याने पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागणार आहे. यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. दरम्यान, सातारा शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून हजारो- लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेने गळती काढण्याचे काम गांभीर्याने केल्यास वाया जाणार्‍या पाण्याची बचत होणार असून पर्यायाने नागरिकांनाही जास्त दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने शहरातील जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्यासाठी प्राधान्य देवून गळती कायमस्वरुपी बंद करण्याचा प्रयत्न करावा, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. 
पालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांनाही मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे चित्र आहे. मात्र, प्राधिकरणाला सांगून काहीही उपयोग होणार नाही. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने करावे, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाला केली आहे. उन्हाळा सुरु झाला असून येत्या काही दिवसांत कास धरणाच्या पाणीपातळीत आणखी घट होणार आहे हे निश्‍चित. त्यामुळे पाणी कपात करणे अटळ आहे. मात्र नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करुन, नळाला तोट्या लावून पाण्याची जास्तीत जास्त बचत करणे आवश्यक आहे. पाणी जास्तीत जास्त दिवस पुरवण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे. किमान पावसाळा सुरु होईपर्यंत तरी, सातारकरांना पाणी उपलब्ध राहील, यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.