पाचगणीकरांवर सातारा पत्रकार संघाची मात
सातारा, 16 - आय लव्ह पाचगणी 2016 या महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या सातारा पत्रकार संघ विरूध्द पाचगणी महोत्सव समिती यांच्यामध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात दमदार धावसंख्या व दीपक प्रभावळकर यांचे दमदार अंतिम षटक यामुळे शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या सामन्यात पत्रकार संघाने अवघ्या एका धावेने विजय नोंदवला.
संजीवन हायस्कूलच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पत्रकार संघाच्या फलदाजांकडून सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले. ओंकार तपासे आणि गुरुदास अडागळे या दोघांना गोलदांज सुनील भिलारे यांनी बाद केले. त्यानंतर मात्र इम्तियाज मुजावर याने चांगली फलंदाजी करत संघाला सावरले. त्यांना प्रविण जाधव, विनय कुलकर्णी, तुषार तपासे, दीपक प्रभावळकर यांनी चांगली साथ दिल्याने पत्रकार संघाच्या 10 षटकात 5 बाद 74 धावा झाल्या. इम्तियाज यांनी 28 धावा केल्या.
क्षेत्ररक्षण करताना सातारा पत्रकार संघाने चेंडू इम्तियाज मुजावर यांच्या हातात दिला. त्यांचे पहिले षटक महागडे ठरले. त्यांनी एका षटकात तब्बल 12 धावा दिल्या. परंतू दुसर्याच षटकात प्रवीण जाधव यांनी पहिला बळी टिपला. नितीन भिलारे आणि सचिन ननावरे यांनी चांगली खेळी केली. दरम्यान, पाचगणी संघाला 18 चेंडूत 23 धावा करुन लक्ष गाठायचे होते. त्यानंतर 12 चेंडूत 17 धावा असा रोमहर्षक सामना चढाओढीत सुरु होता. दोन्ही संघाचे खेळाडू जिंकण्यासाठी खेळताना दिसत होते.
दरम्यान, दीपक प्रभावळकर यांच्या गोलंदाजीवर उंचावरुन मारलेला चेंडूचा झेल इम्तियाज याने घेतला. आणि सामना फिरला. अंतिम षटकात 7 धावांची अवश्यकता असताना प्रभावळकरांच्या हातात चेंडू होता. याच षटकांत दोन त्रिफळाचीत करताना त्यांनी पाचगणीला 73 धावांवरच राखून धरले आणि अंतिम चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात सातारा पत्रकार संघाने अवघ्या एका विजय खेचून आणला.