शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे संस्कार आवश्यक
पुणे (प्रतिनिधी)। 14 - प्लास्टीक कचरामुक्त पुणे शहर अभियान आज राबविण्यात आले. त्यासाठीचा कार्यक्रम रमणबाग शाळेच्या मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या अभियानाचे आयोजन जिल्हा प्रशासन, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि विविध विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानास आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता अभियान आता केवळ शासनाचा उपक्रम न राहता लोकचळवळ झाली आहे. पुणे शहरास प्लास्टीक कचरामुक्त शहर करण्याच्या या अभियानात शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या अभियानात पुणेकर नागरिकही सहभागी होतील आणि पुणे शहर प्लास्टीक कचरामुक्त होण्यात वेळ लागणार नाही. पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, स्वच्छ भारत हा महात्मा गांधीजींचा संदेश होता. तो संदेश आपण कृतीतून पुढे नेत आहोत. आजच्या या उपक्रमात शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. यापुढे या अभियानात पुणेकर नागरिक सहभागी होतील आणि पुणे प्लास्टीक कचरामुक्त होईल. या अभियनात चांगले काम करणार्या शाळांना कचरा पेट्या दिल्या जाणार आहेत. त्या कचरा पेट्यात शाळेच्या परिसरातील कचरा एकत्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाईल. संबंधित उपक्रमातून येणारे उत्पन्न शाळेच्या पर्यावरण मंडळास दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका मुक्ता टिळक, हेमंत रासने, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, उच्च आणि तंत्र शिक्षण संचालक धनराज माने आदी उपस्थित होते. आजच्या या अभियानात पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळांतील सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थी सहभागी झाले. पालकमंत्री गिरीश बापट आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रणबागेतील विद्यार्थ्यांसोबत नदीपात्रातील प्लास्टीक कचरागोळा केला.