Breaking News

अनधिकृत फेरीवाल्यांना शिवसेनेचे संरक्षण

मुंबई, प्रतिनिधी, दि. 13 - अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेत शिवसेनेचे शाखाप्रमुखच काळ्या मांजरांसारखे आडवे येऊ लागले आहेत. प्रभादेवीतील वीर सावरकर मार्ग व सयानी रोड जंक्शन परिसरातील रस्ते व पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असताना शाखाप्रमुखाने अनधिकृत फेरीवाल्यांची तळी उचलत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही ही कारवाई सुरूच राहिल्याने या शाखाप्रमुखाने दादागिरीचे दर्शन घडवत चक्क महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाचे कनिष्ठ अभियंता चंदने यांना मारहाण केली आहे. 
त्यामुळे कारवाई दरम्यान झालेल्या मारहाण आणि धक्काबुक्कीबाबत दादर पोलीस ठाण्यात महापालिकेतर्फे एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर नोंदवू नये, यासाठी पोलीस ठाणे गाठून लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतरही महापालिकेने तक्रार नोंदवत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. मुंबईत मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या पाश्‍वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व रस्ते व पदपथ फेरीवाला व अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कार्यक्रमाला जगभरातील मान्यवर मंडळी येणार असल्याने त्यांना रस्तोरस्ती पथारी पसरून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचे दर्शन घडू नये, यासाठी ही विशेष मोहीम महापालिकेने हाती 
घेतली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून जी/दक्षिण विभागातील देखभाल विभाग, इमारत व फॅक्टरी सेक्शनसह परवाना विभागातर्फे वीर सावरकर मार्ग व सयानी मार्ग येथे कारवाई सुरू होती. या दरम्यान शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख शैलेश माळी यांनी स्टॉल हटवण्यास नकार दिला. त्यानंतरही महाालिकेचे अधिकारी धडक कारवाई करत असताना माळी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कनिष्ठ अभियंता हेमंत चंदने यांनी त्यांना बाजूला होण्याची विनंती केली. परंतु त्यांनी उलट चंदने यांनाच धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर जी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसेंसह चंदने यांनी पोलीस ठाण्यात शाखाप्रमुखाविरोधात तक्रार नोंदवली.
इंजिनीअरिंग असोसिएशनचे राहुल शेवाळे गप्प का?
कनिष्ठ अभियंता हेमंत चंदने यांना शाखाप्रमुखाकडून मारहाणीनंतरही बृहन्मुंबई इंजिनीअर्स असोसिएशन गप्प आहे. या असोसिएशनचे अध्यक्ष शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आहेत. त्यांच्याच पक्षाच्या शाखाप्रमुखाने ही मारहाण केल्याने त्यांनी साधा निषेध नोंदवण्याची तसदीही घेतलेली नाही. आमदार राम कदम यांच्याकडून घाटकोपर येथे अभियंत्याला झालेली मारहाण, एच-पूर्व विभाग कार्यालयात ग्रेस नगरसेविका प्रियतमा सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून अभियंत्याला झालेली धक्काबुक्की, शीतल म्हात्रे यांच्याकडून अभियंत्याला झालेली धक्काबुक्की या सर्व प्रकरणांत इंजिनीअरिंग असोसिएशनने निषेध नोंदवत कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली होती. काम बंद आंदोलनही पुकारले होते. मात्र आता आपल्याच पदाधिकार्‍याकडून चंदने यांना मारहाण झाल्यानंतरही शेवाळे यांनी साधलेली चुप्पी बरेच काही सांगून जात आहे.