Breaking News

पद्मश्री विखे हे विसाव्या शतकातील युगपुरुषः राज्यपाल

 अहमदनगर । प्रतिनिधी । 17 - महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीच्या इतिहासात सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे.  सहकार  चळवळीच्या माध्यमातून कृषि, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात योगदान देणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे विसाव्या शतकातील युगपुरुष होत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन परिसरात राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण, सौ. सिन्धुताई  विखे पाटील ह्रृदय तपासणी केंद्र (कार्डियाक सेन्टर)  आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहाचे (ऑडिटोरियम) उद्घाटन झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी  माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हे होते.  पद्मभूषण  बाळासाहेब विखे-पाटील, गृह राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिन्दे , विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, शालिनीताई विखे-पाटील, डॉ. अशोकराव विखे-पाटील, राजेंद्र विखे-पाटील,  डॉ. सुजय विखे-पाटील आदी उपस्थित होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करुन सर्वांना भेटून आनंद झाल्याचे सांगतातच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कृषि, आरोग्य, शिक्षण, सहकार या क्षेत्रात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाल्याचे त्यांनी 
सांगितले.
 ’एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ’  या उक्तीनुसार सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी काम झाल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले. महाराष्ट्राच्या विकासाचा इतिहास सहकार चळवळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी केलेल्या कार्यामुळेच ते विसाव्या शतकातील युगपुरुष ठरतात.महाराष्ट्रातील तसेच देशातील तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांनी उद्योजकता व कौशल्य विकासाची कास धरुन कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करायला 
हवेत. या उच्च शिक्षीत मनुष्यबळाने जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व गाजवावे, असे आवाहनही राज्यपालांनी केले. कृषि क्षेत्रातील विविध आव्हानांचा उल्लेख करुन आगामी काळात राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची तसेच कृषि संशोधकांची  बैठक घेण्यात येणार असून कृषि क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यात येतील, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले. अध्यक्षपदावरुन डॉ. पतंगराव कदम यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील तसेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या विषयीच्या आठवणी सांगितल्या.पालकमंत्री प्रा. राम शिन्दे यांनीही विखे फाऊंडेशनने कृषि, शिक्षण, वैद्यकीय सेवा, वित्तीय आदी क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थित पाहुण्यांविषयी गौरवोद्गार काढले. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आभार मानले.