शरद पवारांची नक्कल करणे फडणवीसांना भोवले - नवाब मलिक
मुंबई, प्रतिनिधी, दि. 17 - ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेस नियोजनातील ढिसाळपणा कारणीभूत आहे. अग्निशामक नियमांचे उल्लंघन या कार्यक्रमात करण्यात आले असून ‘मेक इन इंडिया’चे ‘शेम ऑन इंडिया’ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
शरद पवारांची नक्कल करणे फडणवीसांना भोवले असून, सरकारने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून ज्या व्यक्तींवर कार्यक्रमाची जबाबदारी होती त्यांची माहिती जाहीर करावी अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. या कार्यक्रमात आतिषबाजी न करण्याची राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला हमी दिली होती. तरीही सर्व नियम धाब्यावर बसवत जोरदारपणे आतिषबाजी करण्यात आली. तसेच आग विझवण्यासाठी चार फायर इंजिन होते असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र अग्निशामक अधिकारी सांगतात की, केवळ दोन फायर इंजिन होते. त्यामुळे नेमके सत्य काय याची शाहनिशा झाली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी अणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1989 साली गिरगाव अणि मरीन ड्राइव्ह येथे फ्रेंच फेस्टिवलचे आयोजन केले होते. त्याचीच नक्कल करण्याचा या राज्य सरकारने हा प्रयत्न केला असल्याचे मलिक म्हणाले. पण कार्यक्रम अकलेने होतो नकलेने नाही, अशा शब्दांत मलिक यांनी सरकारवर टीका केली. भाजप नेते, भाजप समर्थक कलाकार यांचे सरकारी खर्चाने प्रमोशन करण्यासाठी हा उपद्व्याप सरकारने केला असल्याचे ते पुढे म्हणाले. असा प्रकार होणे ही देशासाठी अणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असून या दुर्घटनेमुळे देशाची जगात बदनामी झाली आहे.