एलईडी बल्बच्या वितरणास सातारा जिल्ह्यात प्रारंभ
सातारा, 15 - केंद्र सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्रामअंतर्गत घरगुती वीज ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्ब वितरणास सातारा शहरात सुरुवात करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ग्राहकास बल्ब देऊन सातारा जिल्ह्यात या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात सुमारे सहा लाख घरगुती वीजग्राहकांना पर्यावरणपूरक 60 लाख एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक ग्राहकास एकूण 10 एलईडी बल्ब वितरित करण्यात येणार आहेत.
प्रतापगंज पेठेतील महावितरणच्या शहर उपविभाग कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर, कार्यकारी अभियंता सतीश राजदीप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर देशपांडे, अमित बारटक्के, व्यवस्थापक वैभव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज बचतीच्या राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले. जिल्ह्यात सुमारे 60 लाख एलईडी बल्बचे घरगुती ग्राहकांना वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक ग्राहकास प्रत्येक शंभर रुपयांचा एक बल्ब असे एकूण 10 बल्ब मिळतील. हे बल्ब रोख रक्कम देऊन एकाचवेळी खरेदी करता येईल. त्यात हप्त्यांची योजना आहे. वीजग्राहकांना दहा पैकी जास्तीतजास्त चार एलईडी बल्ब हप्त्याने मिळतील. उर्वरित सहा बल्ब रोखीने घ्यावे लागतील. हप्त्याने बल्ब घेण्यासाठी प्रत्येकी 10 रुपये अँडव्हान्स भरून चार बल्बचे उर्वरित प्रत्येकी 95 रुपये दहा समान मासिक हप्त्यात देता येतील.