सामाजिक सामीलकी संकल्पना कुसुमाग्रजांनीच मांडली
नाशिक/प्रतिनिधी। 01 - तात्यासाहेब वि.वा.शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचा नि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निकटचा स्नेहबंध राहिला. एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना हे विद्यापीठ गीत कुसुमाग्रजांच्या लेखणीतूनच साकार झाले. नव्या युगाचा, नव्या जगाचा ज्ञानच धर्म असल्याची ग्वाही कुसुमाग्रजांनी यातून दिली आहे. परंपरेच्या बंदिघरातून मनाला मुक्त करण्याची ताकद केवळ ज्ञानातच आहे.
सामाजिक बांधिलकी किँवा सामाजिक समरसता यापेक्षाही वेगळी सामाजिक सामीलकीची मांडणी करणारे तात्यासाहेब खर्या अर्थाने सामाजिक भान असलेले कवी होते असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनाचे प्रमुख प्रा.प्रवीण घोडेस्वार यांनी केले. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज जयंतीदिनी मुक्त विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. घोडेस्वार बोलत होते. प्रा.प्रवीण घोडेस्वार पुढे म्हणाले, नाशिकच्या सांस्कृतिक विकासात तात्यासाहेबांचे योगदान अनन्यसाधारण आहे. तात्यासाहेब सातत्याने मराठी भाषेचा विचार करत. मंत्रालयाच्या दारात आशाळभूतपणे उभी असलेली मराठी राजभाषा कशी होईल, यासाठी ते सदैव प्रयत्नशील नि कृतीशील होते. तात्यासाहेबांच्या कल्पनेतून साकारलेला जनस्थान पुरस्कार मराठी साहित्य जगतात आपले वेगळे स्थान राखून असल्याचेही प्रा.घोडेस्वार यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषा समृद्ध करतानाच तिचे संवर्धन आणि सक्षमीकरण करण्याचे कार्य मुक्त विद्यापीठ पुढे नेत आहे. विद्यापीठाकडून दरवर्षी नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहांना विशाखा पुरस्कार देण्यात येतो. विद्यापीठाचा हा पुरस्कार मराठी कवितेच्या प्रांतात एक महत्त्वाचा मानदंड समजण्यात येतो. तसेच देशभरातल्या साहित्यीकांसाठी दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारानेही आपली ओळख प्रस्थापित केली आहे, असेही प्रा.घोडेस्वार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. शरणकुमार लिंबाळे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. मोहन खेरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आणि आभार डॉ. मधुकर शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी, बी.बी.ए विद्यार्थी आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ग्रंथपाल उपस्थित होते.