शिवकार्य गडकोटची ‘रतनगड’वर उत्साही मोहीम
नाशिक/प्रतिनिधी। 01 - शिवकार्य गडकोट मोहिमेची 32 वी गडकोट संवर्धन श्रमदान मोहीम रविवारी (दि.28 फेब्रुवारी 2016) पार पडली. किल्ले रतनगडावरील भग्न असलेल्या राणी महाल तसेच भव्य कल्याण दरवाजाच्या ठिकाणी भर उन्हात श्रमदान करण्यात आले. यावेळी पडझड झालेल्या भग्न राणी महालाच्या मध्यभागी अस्ताव्यस्त पडलेले दगड एकाबाजूला रचण्यात आले तर कल्याण दरवाजाच्या ठिकाणी पायर्यांवर व दरवाजाबाहेर परिसरातील अस्ताव्यस्त पडलेले अवजड दगड बाजूला रचण्यात आले तसेच पायर्यांवरील माती, कचरा साफ करण्यात आला. गडावरील, गडाच्या रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक, बाटल्या, पाकिटे, पाऊच गोळा करण्यात आले. दरम्यान एकूणच रतनगडची भव्यता आणि दूरवरून दिसणारे सह्याद्रीच्या गगनचुंबी डोंगर रांगा व किल्ल्यांचे मनोहारी दृश्य, निसर्ग संपदा, बघून गडकोटांचा वारसा आणि त्याला लाभलेले नैसर्गिक संपदा टिकवण्याची नितांत गरज आहे. शिवकार्य गडकोट मोहिमेच्या रतन गडावर बैठक घेण्यात आली.
नाशिकपासून 80 किलोमीटरवर असलेल्या रतनवाडीपासून रतनगडावर जाण्यास दाट जंगलातून जावे लागते. रतन गड समुद्र सपाटीपासून 4300 फुट उंचीवर हा किल्ला आहे. भांडारदरा धरणाला वळसा घालून किल्ल्याकडे जाता येते. पायथ्याला रतनवाडीला महादेवाचे मंदिर, व कोरीव प्राचीन कुंड व अस्ताव्यस्त झाडाला लागून असलेल्या जुन्या कोरीव वीरगळ आहेत. किल्ल्यावर जाताना वाटा दाखवणारे बोर्ड नाही. चढताना मुख्य दरवाजाच्या अलीकडे मोठ्या लोखंडी शीड्या लावलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर गणेश दरवाजा तेथून उत्तरेस मुक्कामाच्या गुहा, रत्न देवीचे मंदिर, तेथून पुढे कडेलोट हे टेहळनीचे ठिकाण आहे. तेथून समोरच असलेला भव्य आजोबांचा डोंगर लक्ष वेधतो, त्याला लागून उंच कडे असलेले डोंगर दिसतात. रतनगडाकडे जाताना मुख्य दरवाजाच्या पुढे माथ्यावर राणीचा महाल आहे. तो भग्नावस्थेत असून त्याला लागून प्राचीन कुंड आहेत. त्याच्या मागे पश्चिमेला 4 ते 5 मोठे कुंड आहे. किल्ल्याला पूर्वेकडून वळसा घालून गेल्यावर समोर दिसणारा सुळका दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावर किल्ल्याच्या आर पार नेढ आहे या ठिकाणी गार हवा आणि खाली उतरताना गडाच्या उत्तरेस कल्याण दरवाजाची भव्यता दिसते. कल्याण दरवाजाच्या पश्चिमेस उतरत्या पायर्या व उंच शीड्या बघून इतिहासाचा वारसा त्याकाळी किती प्रगत होता हे दिसून येते. मोर्चाची बुरुजे, प्रवरा नदीचे उगमस्थान ह्याच किल्ल्यावर आहे. रतनगड 1663 साली कोळी सरदार सावजी यांच्या ताब्यात होता. 1824 साली आदिवाशी सेनानी रामोजी भांगरे याच्या ताब्यात हा गड होता.असा उल्लेख गॅझेट मध्ये आहे.
किल्ले रतनगड श्रमदान मोहिमेत शिव्कार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक प्रमुख राम खुर्दळ, मुख्य संयोजक योगेश कापसे ,जेष्ठ पक्षिमित्र भीमराव राजोळे, जेव्हा गड बोलू लागला फेम संकेत नेवकर, शिस्त पालन समितीचे हर्शल पवार, पवन माळवे, हरी पवार, डॉ.अजय पाटील, प्रचार समितीचे निलेश ठुबे , नंदकुमार कापसे, महेश पाटील, आकाश महाले, निलेश डहाके, जेष्ठ दुर्गमित्र मनोहर काळे, योगेश अहिरे, मनोज कांबळे, मारुती रंगे, बाल शाहीर करण मुसळे, अद्वैत पुजारी यासह श्रमिक दुर्गसंवर्धक उपस्थित होते .