सरकारकडून उद्योजकांचे भले शेतकर्यांना वार्यावर सोडले ः सावंत
सांगली, 10 - सत्तेवर असलेल्या हिंदुत्ववादी सरकारकडून केवळ उद्योजकांचे भले करण्याचे काम सुरु आहे. शेतकर्यांना वार्यावर सोडून उद्योजकांना सवलती देणार्य या सरकारकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसून, या सरकारकडून शेतकर्यांना संपविण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप ब्रिगेडियर (नि) सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उद्या (9) संविधा मोर्चाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते.
सावंत पुढे म्हणाले की, सत्तेवर असलेल्या हिंदुत्ववादी सरकारकडून हिंदूच असलेल्या शेतकर्यांचे मुडदे पाडण्याचे काम सुरु आहे. त्यांचे उद्योजकांविषयी प्रेम आणि शेतकर्यांची अवहेलना हे बेगडी स्वरुप आता जनतेसमोर येत आहे. केवळ पाच कोटींसाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन लांबविणार्या सरकारकडून उद्योजकांकडून मात्र सवलतींचा वर्षाव सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योजकांना 1 लाख 25 हजार रुपयांची सूट देण्यात आली. नरसोबावाडी देवस्थानला 121 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. कोल्हापूर येथील 400 कोटी रुपयांचा टोल माफ करण्यात आला. मात्र केवळ पाच कोटींसाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यास सरकारकडून ताठर भूमिका घेण्यात येत आहे. यावेळी सुभाष तंवर, सदानंद पवार, जे. के. बापू जाधव, प्रा. सिध्दार्थ जाधव, संपतराव पवार, अॅड. अजित सूर्यवंशी, अॅड. के. डी. शिंदे, दीपक पाटील, मनसेचे तानाजी सावंत उपस्थित होते.