नगरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
अहमदनगर, 29 - शिस्तप्रीय पक्षाचा डांगोरा पीटनार्या भाजपचा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अहमदनगर जिल्हाध्यक्षपदासाठी बोलवलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याच उपस्थितीत कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.
पक्ष भाड्यानेच दिल्याचा जाहीर आरोपच काही कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळं गोंधळात आणखीच भर पडल्याने खुद्द गृहराज्यमंत्र्यांनाच सुनावण्याची वेळ आली. मात्र त्यानंतरही शाब्दिक बाचाबाची सुरु झाल्याने वातावरण पुन्हा तापले. जाहीर आरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरण हातघाईवर आले. काहीजण तर हात जोडून गप्प राहण्यासाठी विनवण्या करताना ही दिसत होते. मात्र तरीही गोंधळ थांबत नसल्याने शेवटी पोलीस बैठकीत हजर झाले.त्यानंतर गोंधळातच काही मिनिटात भानुदास बेरड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला.