अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा विदर्भ, मराठवाड्याला तडाखा
पुणे, 29 - हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिसकावाला आहे. एकीकडे दुष्काळग्रस्तांना सावरण्यासाठी सरकार आणि स्वंयसेवी संघटना प्रयत्न करीत असतानाच संकटाची मालिका काही शेतकर्यांची पाठ सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज दुसर्या दिवशीही राज्याच्या काही भागांत पाऊस आणि गारपीट सुरूच होती.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, नाशिक, विदर्भात पावसाबरोबच गारपीट होऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यंदा बेताचाच पाऊस झाल्याने खरीप हंगामातही शेतकर्यांच्या हाती काही लागले नाही. खरिपापाठोपाठ आलेल्या रब्बीत काही तरी हाती लागेल, या आशेवर असलेल्या शेतकर्यांच्या डोळ्यात अवकाळीने आणि गारपिटीने पाणी आणले. रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारीबरोबच भाजीपाला, द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळीचे पीक हाताशी आले होते. विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी भागांत पाऊस झाल्याने पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, खानापूर, जत, तासगाव तालुक्यांतील काही गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. जत तालुक्यातील संख, पांडोझरीला जोरदार पाऊस झाला.
गोंधळेवाडी गावात जोरदार वारे व पावसामुळे सात एकर द्राक्षबाग कोसळली. तसेच खानापूर तालुक्यातही गारांचा पाऊस झाला. तर, तासगावमध्ये पाऊस झाल्याने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यांत बेदाण्याचे मोठे नुकसान झाले. तसेच सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांत मुसळधार पाऊस झाला. महामार्गावर खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपापर्यंत पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती. पुणे जिल्ह्यातील बारामतीसह काही भागांत पाऊस झाला आहे. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, चिखलदरा परिसर, वर्धा जिल्ह्यातील कारंजा आणि नागपूर जिल्ह्यात मौदा, सावनेर तालुक्यात गारपीट झाली, तर धामना परिसरात अवकाळी पावसाला सुरवात झाली. सावनेर तालुक्यात बोराएवढ्या गारा पडल्याने पिकाचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व चांदूरबाजार तालुक्यांत गारपिटीसह आलेल्या वादळाने अनेक घरांची पडझड झाली आहे, तर शेतात उभा असलेला हरभरा, गहू, कांदा व संत्रा आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.