चारा छावण्या बंद का केल्या- उच्च न्यायालय
मुबंई/प्रतिनिधी । 16 - राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून त्यात मराठवाड्यात गेल्या दीड महिन्यात 124 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची कबुली सरकारने देऊनही, चारा छावण्या का बंद करण्यात आला, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. मराठवाड्यात दुष्काळाची धग दिवसेंदिवस तीव्र होत असताना राज्य सरकारने मात्र सुरू असलेल्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर या सर्वाधिक दुष्काळ प्रभावित जिल्ह्यांतल्या चारा छावण्या बंद करण्याचे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेस व राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला असून, राज्य सरकारचा हा ‘रझाकारी’ निर्णय असल्याची टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयावर जोरदार ताशेरे ओढताना न्यायालयाने चारा छावण्या बंद करण्यामागील कारणे सरकारकडे मागविली आहेत. पाणी, चारा छावण्यासंदर्भातील माहिती सरकारकडून देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.