वीरपुत्राला अखेरचा सलाम !
सातारा/प्रतिनिधी । 17 - सियाचीन येथील हिस्मस्खलात शहीद झालेले माणदेशचे वीरपूत्र सुनील सुर्यवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मस्करवाडी या मूळगावी लष्करी इतमामात व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्यासंख्येने या वेळी उपस्थित होते.
सियाचीन येथे 3 फेब्रुवारी रोजी आलेल्या हिमवादळात सुनील सुर्यवंशी यांना वीरमरण आले. सुनील सुर्यवंशी यांचे पार्थिव लष्करी वाहनातून आज सकाळी त्यांचे मूळगाव मस्करवाडीत आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळया काढण्यात आल्या होत्या. तसेच ‘सुनील सुर्यवंशी अमर रहे !’, ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देण्यात येत्या. मद्रास रेजिमेंटकडून लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वीरपुत्राला अखेरचा सलाम करताना उपस्थित नागरिकांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या.