Breaking News

म्हणे, दुष्काळ संपला! चारा छावण्या बंद!! सरकारचा तुघलकी कारभार!!!

मुंबई, प्रतिनिधी, दि. 17 -  मराठवाडा, विदर्भातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सहन करत असताना दुष्काळ संपला अशी खुशखबर देत फडणवीस सरकारने चारा छावण्या बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी-चार्‍याची तीव्र टंचाई असल्यामुळे शेतकर्‍यांनी आपली जनावरे चारा छावण्यांत ठेवली आहेत. लातूर परिसरातील दुष्काळी परिस्थितीची दखल तर थेट राष्ट्रपती भवनाने घेतली आहे.
शेतकर्‍यांच्या माथ्यावरील आभाळ असे फाटले असतानाच बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचा धक्कादायक निर्णय शासकीय आदेशाने अमलात आला आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली असून सरकारचा चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय रझाकारी असल्याची बोचरी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालली आहे. लातूरसह अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, माणसे देशोधडीला लागली आहेत, शेतजमीन चिरफाळली आहे. बीड आणि उस्मानाबाद पट्टयातही हीच अवस्था आहे. जलस्रेतांमध्ये असलेले उरलेसुरले पाणीही झपाटयाने संपत चालले असून, कोरडा दुष्काळ वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना विश्‍वास आणि आधार द्यायचा सोडून फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्या जीवाला आणखी घोर लावला आहे.
रब्बी हंगामापासून उपलब्ध असलेला चारा पुढील तीन महिने इतका म्हणजे मे 2016 पर्यंत पुरणार असल्याचा अजब शोध सरकारने लावला आहे. आपापली जनावरे घेऊन जा, असे जिल्हाधिकारी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सांगू लागल्याने, गोवंश रक्षकांचा आव आणणारे हे सरकार मुक्या जनावरांच्या जीवावरही उठले असल्याचा संताप व्यक्त होत आहे. गावात पाण्याचा थेंब नसताना चारा छावण्या बंद केल्यास जनावरांना चारा-पाणी 
आणायचे कुठून, जगवायचे कसे, अशा प्रश्‍नांनी शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.सरकारचा रझाकारी निर्णय, विरोधकांची टीका ऐन दुष्काळी परिस्थितीत अशाप्रकारे चारा छावण्या बंद केल्यास जनावरे पाणी-चाराअभावी मृत्युमुखी पडतील. शेतकर्‍यांबरोबर मुकी जनावरे मरण्याचे पाप सरकारचे असेल. सरकारचा हा निर्णय म्हणजे रझाकारी असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये अचानक चारा कसा काय निर्माण झाला? चारा होता तर मग अधिकच्या चारा छावण्यांना परवानगी दिली कशी? असे अनेक प्रश्‍न मुंडे यांनी उपस्थित केले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जनावरांना छावण्यात चारा, पाणी मिळत होते. आता गावात परत गेल्यास तिथे चारा किंवा पाणी मिळणार नाही. सरकारला शेतकर्‍यांची मुकी जनावरे मारूनच टाकायची आहेत का? अशी उद्विग्नताही मुंडे यांनी व्यक्त केली.