कर न भरण्यासाठी एक संघटना बनवण्याचा निर्णय - अंजली दमानिया
मुंबई, 09 - सरकारला जोपर्यंत भ्रष्टाचार थांबवता येत नाही तोपर्यंत त्यांनी टॅक्स भरू नये असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवल्यानंतर काही करदात्यांनी कर न भरण्यासाठी एक संघटना बनवण्याचा निर्णय घेतला. ‘आप’ नेत्या अंजली दमानिया आणि अॅड गुरू अलेक पदमसी या दोघांनी सरकारला अधिक जबाबदार बनवण्यासाठी आणि टॅक्सला नकार देण्यासाठी एक संघटना उभारणार आहेत.
उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतानंतर अंजली दमानिया यांनी सर्वात पुढे येऊन, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अटक होत नाही तोवर सरकारला कोणतेही टॅक्स न भरण्याचा निर्णय जाहीर केला होता. अंजली दमानिया आता या मोहीमेला अधिक व्यापक रूप देणार आहेत. आधीच्या सरकारमधील भ्रष्टाचारी नेत्यांना तुरूंगात डांबण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आले मात्र त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत हे सरकार काहीच कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळेच अंजली दमानिया यांनी टॅक्स न भरण्याचे ठरवले आहे, या मोहीमेत त्यांना आता अॅड गुरू अलेक पदमसी
यांचीही साथ मिळाली. सर्वच पातळ्यांवर वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे टॅक्स न भरण्याच्या कल्पनेवर अनेक वर्षांपासून विचार करत असल्याचे अलेक पदमसी सांगतात, मात्र त्यांना आता प्रत्यक्ष कृती करायची आहे, यासाठी त्यांनी टेलिफोनवरून अंजली दमानिया यांच्याशीही चर्चा केली.