Breaking News

मुस्लिम पोलिसाची धिंड

रेणापूर, 22 - वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याच्या कथित कारणावरून संतप्त जमावाने पोलिस चौकीत घुसून कर्तव्य बजावणार्‍या दोन पोलिसांना बेदम मारहाण केली. चौकीतील कागदपत्रांची व साहित्याची नासधूस करत सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या हातात भगवा ध्वज देऊन पोलिस चौकीपासून वादग्रस्त जागेपर्यंत धिंड काढल्याची घटना शुक्रवारी घडली. 
लातूर जिल्ह्यातील पानगाव (ता. रेणापूर) येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीत दोन पोलिसांपैकी एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पानगाव येथील आंबेडकर चौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुभाजकातील वादग्रस्त जागेवर येथील शिवभक्तांनी भगवे ध्वज लावण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री केला. यावेळी कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक वाय. पी. शेख हे घटनास्थळी गेले व त्यांनी या वादग्रस्त जागेवर ध्वज लावू नका, अशी विनंती शिवभक्तांना केली. त्यानंतर तेथून सर्वजण निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शहरात घडलेल्या घटनेची विपरीत व चुकीची चर्चा गावात पसरवली गेली व पोलिसांनीच सदरील जागेवरील भगवे ध्वज काढून टाकल्याची अफवा शहरात पसरल्याने संतप्त जमाव गाव बंद करण्याचे आवाहन करीत पोलिस चौकीवर धडकला.