Breaking News

बाजार समित्यांनी शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आवश्यकता - चंद्रकांत पाटील

 पुणे (प्रतिनिधी)। 13 -  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सहकार तथा पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. 
पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणार्‍या अद्ययावत फुल बाजाराच्या इमारतीचे भूमीपूजन आज येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेशी व्यासपीठावर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. श्री. पाटील यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. पण हे उद्दीष्टय साध्य झाले असे म्हणता येत नाही. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजारसमित्यांची कामकाजात पारदर्शकता येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समित्यांच्या कामकाजात संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याची आवश्यकता आहे. 
येथे उभारण्यात येणारी फुलबाजाराची इमारत अतिशय आघुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणार आहे. या फुलबाजारामुळे येथील फुलउत्पादक शेतकर्‍याला चांगला भाव मिळायला हवा. शेतकर्‍याला फुलशेती म्हणजे ऊसशेतीला पर्याय वाटायला हवी, असे श्री. पाटील यांनी सांगितले.बाजार समित्यांनी शेतकर्‍यांना आधुनिक सेवा देतानाच गोदामांची साखळी विकसित केली पाहिजे. शेत मालाला भाव मिळत नसेल तर त्याचा माल त्याला संबंधित गोदामात ठेवता आला पाहिजे. त्यावर त्याला तारण कर्जही मिळायला हवे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजार समित्यांतील विविध प्रश्‍नांच्या बाबात येत्या काही दिवसांत सर्व संबंधितांची बैठक बोलावली जाईल, असे सांगितले. बाजार समितीत येणार्‍या शेतकर्‍यांना विविध सोयी आणि सवलती पुरविण्यासाठी शेतकरी भवन उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी 
सांगितले.यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, बाबूराव पाचर्णे, भीमराव तापकीर, बाजार समितीचे प्रशासक दिलीप खैरे, धनंजय डोईफोडे आदी उपस्थित होते.