Breaking News

पर्यटकांच्या माहितीसाठी वेबसाईटवर सध्यस्थितीचे फोटो टाकावेत

सातारा, 09 - कास पठारावरील पुष्पबहाराची जुनी छायाचित्रे संकेतस्थळावर टाकली जात असल्याने पर्यटकांची दिशाभूल होते. आता या संकेतस्थळावर प्रत्येक दिवशीचे ताजे छायाचित्र अपलोड केले जाईल. त्यामुळे पर्यटकांना कास पुष्पपठाराची नेमकी माहिती मिळेल आणि पुष्पांचा रंगोत्सव पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल अशी माहिती कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी दिली. 
गेल्या हंगामात संकेतस्थळावरील जुने फोटो आताचे आहेत असे समजून कासला आलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला होता. 
महाबळेश्‍वर येथील पोलो मैदानाची पाहणी करण्यासाठी राव आले होते. महाबळेश्‍वरला जाण्यापूर्वी त्यांनी सातार्‍यातील उपवनसंरक्षक कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कास पठारावर पुष्पोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. पण वन विभागाच्या वेबसाइटवर जुने फोटो टाकले जातात. त्यातून पर्यटकांची दिशाभूल होते. प्रत्यक्षात जागेवर फुलेच आलेली असतात किंवा नसतातही. अशा वेळी पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते असे नमूद करुन राव म्हणाले, जुने फोटो अपलोड होत असतील तर ही बाब गंभीर आहे.
 यापुढे कास पठारावरील पुष्पोत्सवाची नेमकी स्थिती असणारे फोटोच ज्या-त्या दिवशी अपलोड केल जातील. जेणेकरुन पर्यटकांना पठाराची नेमकी माहिती मिळेल.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर पोलो मैदान विस्तारीकरणाचा प्रश्‍नच नाही. या संदर्भात कोणताही प्रस्ताव वन विभागाकडे आलेला नाही. त्यामुळे पोलो मैदानाचे विस्तारीकरण आणि झाडांची तोड होणार नाही. हा भाग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. त्यामुळे एकही झाड तोडता येणार नाही. पोलो मैदानावरील दोन हेक्टर क्षेत्रावर कोणतीही झाडे नाहीत. तेथे एप्रिलमध्ये पोलोचे प्रदर्शनीय सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मैदानात येणारे एक झाड काढण्याचा प्रस्ताव आम्ही नागपूरला पाठविणार आहोत, असे त्यांनी यासंदर्भातील प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
बिबट्यांच्या पदभ्रमण मार्गावर भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल
सातारा : बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगत खिंडवाडीजवळ बिबट्यांसह वन्य श्‍वापदांचा पदभ्रमण मार्ग असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. या ठिकाणी गेल्या सलग दोन वर्षात दोन बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला असून त्यात दुर्मिळ अशा ब्लॅक पँथरचा बळी गेल्यामुळे या विषयाची संवेदनशीलता वाढली आहे. या भागातून जाणारा महामार्ग ओलांडणे बिबट्यांना सोयीचे होण्यासाठी वाहनांच्या रात्रीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करणारा सूचना फलक लावण्याबरोबरच या भागात भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारण्याबाबत वन विभाग विचार करत असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.