Breaking News

मांगी-तुंगीच्या वैद्यकीय मदत केंद्रात 2200 रुग्णांवर उपचार

नाशिक/प्रतिनिधी। 16 -  मांगी-तुंगी  येथे 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यांतर्गत मुख्य सभामंडपाजवळ स्थापित वैद्यकीय मदत केंद्रात पाच दिवसात 2200 रुग्णांवर उपचार करण्यात आले.
 मांगी-तुंगी येथे प्रशासनातर्फे  आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित  करण्यात आला आहे. त्याअंतर्गत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. सुनील पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष 18 फेब्रुवारी 2016 पर्यंत 24 तास कार्यरत राहणार आहे.  आरोग्य कक्षात 20 वैद्यकीय अधिकार्‍यांसह हिवताप विभाग आणि  राष्ट्रीय बालस्वास्थ्य आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसह 150 कर्मचारी कार्यरत आहेत. डॉ. अनंत पवार या केंद्राचे नियंत्रक अधिकारी आहेत. मुख्य सभामंडपाजवळ दहा खाटांचा साइट आयसीयू कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवासाची व्यवस्था असलेल्या  सात कॉलनीजवळ बाह्यरुग्ण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका कार्यरत आहेत. याठिकाणीदेखील भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.  तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ताहराबाद, ग्रामीण रुग्णालय, सटाणा, ग्रामीण रुग्णालय, नामपूर येथे अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
याशिवाय 108 म्ब्युलन्स सेवेंतर्गत 16 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्या 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. एकूण उपचार केलेल्या रुग्णांपैकी दहा ते बारा रुग्णांना या रुग्णवाहिकांचा लाभ झाला. त्यामुळे या रुग्णांवर तातडीने उपचार करणे आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना शक्य झाले आहे, अशी माहिती सटाणा तालुका आरोग्याधिकारी डॉ. नीलेश सोनवणे यांनी दिली. या आरोग्य केंद्रात प्रामुख्याने सांधेदुखी, स्नायू दुखी, ताप, सर्दीचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत, तर हृदय विकाराच्या त्रास जाणवणार्‍या एक- दोन रुग्णांवर प्रथमोपचार करुन तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या रुग्णांवर औषधोपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सटाणा ग्रामीण रुग्णालय, परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे औषधे पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे..
पाण्याच्या नमुन्यांची तपासणी
मांगीतुंगी येथे कार्यरत वैद्यकीय मदत केंद्रांतर्फे पाणीपुरवठ्याकडे लक्ष दिले जाते. त्यासाठी पाण्याचे नमुने, टीसीएलच्या नमुन्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. डासांची निर्मिती होवून साथीचे आजार वाढू नयेत म्हणून आरोग्य विभाग दक्ष आहे. येथे उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेची वेळोवेळी पाहणी करुन धुरळणी आणि बेटिंग केले जाते. या सर्व आरोग्य सेवा पुरविणेकामी आरबीएसके विभाग, हिवताप कर्मचारी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कर्मचारी विभाग, 108 कर्मचारी विभाग नेमण्यात आले आहेत.