पुण्यातील 12 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू
रायगड, 01 - पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले 12 विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरूड बीचवरील समुद्रात बुडून मृत्य झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12 विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रात बाहेर काढण्यात यश आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांत तीन मुली व 9 मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावी व बारावीतील सुमारे 126 विद्यार्थी आज सकाळी पुण्यातून तीन मोठ्या बस करून रायगडमधील मुरूड बीचवर फिरायला गेले होते. आज सकाळी पुण्यातून निघाल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास तेथे ते पोहचले. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर तीनच्या सुमारास हे विद्यार्थी मुरूड किना-यावरील समुद्रात पोहायला उतरले. अनेक मुले एकाच वेळी समुद्रात पोहायला गेली. अनेक मुले बुडू लागल्याने आरडाओरड सुरु झाला व एकच गोंधळ उडाला. यात अनेक मुले समुद्रात खेचली गेली व बुडाली.
ही माहिती मिळताच स्थानिकांनी, महसूल विभागाची कर्मचा-यांनी व पोलिसांनी बचाव कार्य सुरु केले. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. केवळ चार मुलांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू झाला आहे.