Breaking News

युती सरकारच्या भुमिकेचा राकाँच्या बैठकीत निषेधाचा ठराव


 जळगाव/प्रतिनिधी। 9 -  राज्यात दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्यांना तोकडी मदत देण्याच्या युती सरकारच्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत गुरुवारी निषेधाचा ठराव करण्यात येऊन लवकरच तालुकावार आंदोलनाचे नियोजन करण्याचा निर्णय झाला. 
राष्ट्रवादी कॉँग्रेसची जिल्हा बैठक पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी झाली. पक्षाचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या  9 जानेवारी रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांसमवेत पक्षाची बैठक दुपारी 1.30 वाजता जैन हिल्सवर होणार आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी यावेळी केले. पवारांना 75 किलोचा हार देऊन सत्काराचे नियोजन बैठकीत झाले. बैठकीस माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. युती सरकारने दुष्काळी क्षेत्रातील शेतकर्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले मात्र कोणाला किती मिळणार याबाबत उल्लेखच नाही. ही शेतकर्यांची फसवणूक असून या भूमिकेचा निषेध करण्याचा ठराव त्यांनी मांडला. तसेच या विरोधात प्रत्येक तालुक्यात आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले जावे अशी सूचना त्यांनी केली. माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, प्रा.एस.एस. पाटील, राहुल सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली न गेल्याने या विरुद्ध आंदोलनाचे आवाहन प्रा. पाटील यांनी केले. त्यास सोनवणे यांनी अनुमोदन दिले. 
सत्तेतील युती सरकारमध्ये सतत भांडणे सुरू आहेत. दोरी कोणी तोडायची याची वाट आता बघायची आहे. त्यामुळे निवडणुकाही लागू शकतात. सर्वांनी एकजुटीने तयार रहावे असे आवाहन डॉ. सतीश पाटील यांनी केले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले. किसान सेलने शेतकर्यांकडून फॉर्म भरून त्याची याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फॉर्म प्रत्येक तालुक्याने भरून द्यावे असेही डॉ. पाटील म्हणाले. बैठकीस कार्याध्यक्ष विलास पाटील, अँड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, उमेश नेमाडे, अरुण पाटील, महानगर अध्यक्ष परेश कोल्हे, जिल्हा बॅँक संचालक तिलोत्तमा पाटील, संजय पवार, मोहन निकम, मंगला पाटील, माधुरी पाटील, कल्पना पाटील, कल्पिता पाटील, शुक्राम पाटील, विजय चौधरी, राजेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.