Breaking News

मुस्लिम महिलांची हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी लढाई !

मुंबई, 29 - शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी महिलांचे आक्रमक आंदोलन सुरू असतानाच आता मुस्लिम महिलाही अशाच मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना मजारपर्यंत प्रवेश द्यावा, या मागणीसाठी काही महिलांनी गुरुवारी मुंबईत आझाद मैदानात जोरदार निदर्शने करत फलक झळकावले. हातात फलक घेऊन या महिलांनी दर्ग्यातील प्रवेशासाठी जोरदार घोषणा देत आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. याच मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. येत्या 3 फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार आहे.
हे एकविसावे शतक आहे, आपण विज्ञान युगात आहोत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत महिला योगदान देत असून पुरुषांना समतेचे अधिकार मिळतात तर महिलांना का नाही? आम्हाला हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळायलाच पाहिजे, असे सवाल करत मुस्लिम महिलांनी हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आज आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. जोपर्यंत हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू आणि दर्ग्यात घुसून दाखवूच असा निर्धारही या महिलांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे महिलांसाठी खुली असलेली दर्ग्यातील कबर गेल्या दोन वर्षांपासून ट्रस्टने बंद केली. ही कबर महिलांसाठी खुली करा, कबरीवर चादर चढविण्यास महिलांनाही परवानगी द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या डॉ. नुरजहान सफिया निझा आणि झाकीया सोमन महिलांच्या वतीने अ‍ॅड. राजू मोरे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर ट्रस्टने आडमुठी भूमिका घेत हाजी अली दर्ग्यातील कबरीजवळ मुस्लिम महिलांना घातलेली बंदी योग्यच असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.