Breaking News

समीर गायकवाडचा जामीन फेटाळला

कोल्हापूर, 29 -  कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन नाकारला आहे. ‘समीरला जामीन मिळाला तर साक्षीदारांवर दबाव येवू शकतो तसेच मडगाव स्फोटातील फरारी रुद्र पाटील याच्याप्रमाणे समीरही फरारी होवू शकतो,’ असा विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने समीरचा जामीन अर्ज फेटाळला.
समीरच्या जामीन अर्जावर चारच दिवसांपूर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. बी. बिले यांनी थेट निर्णय दिला. आता फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ‘पानसरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा समीरवर आरोप आहे. अशा परिस्थितीत त्याला जामीन मिळाला तर अपुर्‍या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल. तसेच रुद्र पाटीलप्रमाणे समीरही फरारी होईल. समीरच्या 
विरोधात सबळ परिस्थितीजन्य पुरावा असताना त्याला सोडणे योग्य होणार नाही,’ अशी बाजू सरकारच्या वतीने अ‍ॅड. निंबाळकर यांनी मांडली होती. उच्च न्यायालयाचे या खटल्यावर नियंत्रण असून फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या वेळी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने झाली का याबाबतचा अहवाल कर्नाटक पोलिसांकडून सादर केला जाणार आहे. तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी राजारामपुरी पोलिसांना साक्षीदाराच्या सुरक्षेबाबत पत्र पाठवले असून त्यावर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. हे पत्र म्हणजे अप्रत्यक्ष धमकीच आहे असा आरोप केला जात आहे. त्यामुळे समीर याला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे.