Breaking News

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ

मुंबई, 29 - कोकणातील रस्ते वाहतुकीची मुख्य वाहिनी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला अखेर 29 जानेवारीला प्रारंभ होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
केंद्रातील काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या काळात महामार्गाच्या चौपदरीकरणाचा धोरणात्मक निर्णय झाला.  त्यानुसार रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कामही सुरू झाले. पण रायगड जिल्ह्यातील काम ठेकेदाराशी मतभेद झाल्याने रखडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अगदी दक्षिणेच्या टोकाला असलेला सावंतवाडी ते पत्रादेवी हा टापू वगळता काम सुरू होऊ शकलेले नाही. या पाश्वभूमीवर सुमारे दीड वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील रस्ते वाहतूकमंत्री गडकरी यांनी या रखडलेल्या प्रकल्पामध्ये जातीने लक्ष घालून चालना दिली. राज्यातही भाजप-सेना युतीचे सरकार आल्यामुळे चौपदरीकरणासाठी आवश्यक जमिनीची मोजणी आणि संपादनासारख्या प्रशासकीय क
र्यवाहीलाही गती मिळाली. या टापूतील 14 लहान-मोठया पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन गडकरी यांच्याच हस्ते ऑगस्ट 2014 मध्ये झाले असून अनेक ठिकाणी ही कामे प्रगतिपथावर आहेत. 
चौपदरीकरणाचे काम अजिबात सुरू न झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भू-संपादनाचे काम सुमारे 90 टक्के पूर्ण झाले असून विस्थापितांना प्रचलित बाजारभावापेक्षा पाचपट जास्त मोबदला देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारापपर्यंतचा मिळून एकूण 366 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ते वेगाने पूर्ण होण्यासाठी सहा टप्प्यांत विभागले असून त्याच्या कामाच्या निविदा पुढील महिन्यात निघणार आहेत. 2018 च्या अखेपर्यंत हे काम पूर्ण करण्याची योजना आहे. हा संपूर्ण महामार्ग सिमेंट काँक्रीटचा राहणार आहे. या कार्यक्रमानंतर येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या नवीन पदव्युत्तर विभागाच्या इमारतीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.