Breaking News

विकासाला कुरघोडीमुळे खीळ ः सीताराम येचुरी

 पुणे (प्रतिनिधी)। 31 -  अनेक जाती धर्मांचे, वेगवेगळ्या विचारसरणींचे लोक भारतात राहतात. त्या आधारावर विविध पक्ष निर्माण झालेले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात विकासाला खीळ बसली असून आपण वर्तमानपत्र, ब्लॉगमधून ते वाचत असतो. केवळ एवढेच करून चालणार नाही त्यासाठी युवकांनी राजकारणात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय छात्र संसदेच्या सहाव्या सत्रात ‘राजकारण, निवडणुका आणि न्यायव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त एन. संतोष हेगडे, बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, मोहनलाल सुखडीया विद्यापीठाचे कुलगुरु आय. व्ही. त्रिवेदी, निर्वासित तिबेटचे पंतप्रधान लोबसांग सांगे, माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल कराड, माजी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे, अरब अमिराती येथील भाजपचे युवा अध्यक्ष टी. आर. रेमेश, न्यूझिलंड सरकारचे खासदार महेश बिंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. छत्तीसगड रायपूर येथील आमदार नवीन मार्कंडेय, उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचे आमदार ललितेश त्रिपाठी यांचा आर्दश युवा आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले.
सीताराम येचुरी म्हणाले की, देशात पक्षीय राजकारण असल्याने निवडणुका चुरशीच्या बनतात. राजकारणात किंवा न्याय व्यवस्थेत परिवर्तन घडणे आवश्यक असते. कारण परिवर्तनातून नवीन प्रगतीचे मार्ग सापडतात. या परिवर्तनासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपण निवडलेले सरकारच आपल्या देशाचे भविष्य घडविते तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातही प्रत्येक व्यक्तीचे मूल्य जपणे तसेच एक व्यक्ती एक मत, अशी महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे त्याचे पालन होणे गरजेचे आहे. विजयकुमार चौधरी म्हणाले की, राजकारण सुधारण्यासाठी सर्वप्रथम राजकारणाबाबतची भावना स्वच्छ असणे महत्त्वाची आहे. देशाला चांगल्या नेत्यांची गरज आहे तसेच नागरिकांनी जागरूकतेने मतदान केल्यास देश आघाडीवर नक्कीच जाईल.
तसेच देशात अनेक चांगले नेते आहेत; परंतु त्यांच्याकडे आज अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अशा नीतिमान नेत्यांची देशाला अत्यंत गरज आहे. संतोष हेगडे म्हणाले की, देशातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत. चांगले शिक्षण घेण्याबरोबरच आपण राजकारणही समजून घ्यायला हवे. 
कारण आपण निवडलेला नेता आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. योग्य नेते राजकारणात आले तर देशाची प्रगती होण्यास जास्त काळ लागणार नाही.