Breaking News

संतोष मानेला पकडणार्‍या लोणकर यांना पोलीस जीवनरक्षा पदक

पुणे (प्रतिनिधी), 31 - ः तीन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये बेदरकारपणे एस.टी. चालवत 9 जणांचे प्राण घेणार्‍या एस.टी.चालक संतोष माने याला पकडणारे पोलीस शिपाई बापू लोणकर यांना पोलीस जीवनरक्षा पदकाने सन्मानीत करण्यात आले. 
पुण्याचे पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांच्या हस्ते लोणकर यांना पदक देऊन गौरवण्यात आले.2012 मध्ये 25 जानेवारी रोजी पुणे शहरात एस.टी. चालक संतोष माने याने बेदरकारपणे आपल्या ताब्यातील एस.टी. चालवत रस्त्यावरील 9 नागरिकांचे प्राण घेतले होते. यावेळी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई बापू लक्ष्मण लोणकर यांनी एस.टी.चा पाठलाग केला व आपल्या जीवाची पर्वा न करता बसच्या पाठीमागच्या शिडीवरून टपावर चढून मागील खिडकीतून एस.टी.मध्ये प्रवेश केला व माने याला पकडून दिले. त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचून पुढील अनर्थ टळला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पोलीस जीवनरक्षा पदक बहाल करण्यात आले. त्यांना पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.