नगरमध्ये राज्यस्तरीय कुमार गट हॉकी स्पर्धा
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - जिल्हा हॉकी असोसिएशनच्यावतीने शहरातील क्रीडा संकुलात 14 ते 17 जानेवारी दरम्यान होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील 30 संघ सहभागी होणार असून,केवळ नगर जिल्ह्याचे दोन संघ सहभागी होणार असल्याची माहितीअसोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार प्रसादर तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष शंकरराव घुले, उद्योजक विजय सेठी, प्रा. असिफ शेख आदी उपस्थित होते.
नगर शहरात प्रथमच राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा होत असून, पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. 17 वर्षे वयोगटाखालील संघात ही स्पर्धा होणार आहे. रविवारी (दि.10) बार्नबस ट्रॉफी नावाने निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार असल्याचे यावेळी संघटनेचे सचिव प्रा. रंगनाथ डागवले यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांच्यावतीने करण्यात येणार आहे. क्रीडा संकुलात हॉकी लॉन बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, दोन लॉन तयार करण्यात येत आहेत. राज्य असोसिएशनच्यावतीने या स्पर्धेसाठी पंच पाठविण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी असोसिएशनच्यावतीने विविध समित्यांची स्थापना करून कामाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. समारोप 17 रोजी महापौर अभिषेक कळमकर,आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थित होणार आहे. हॉकीचे नवे स्वरुप असलेला फाईव्ह इनसाइट हॉकी हा खेळ विकसित होत आहे.असे विजय सेठी यांनी सांगितले.