औरंगाबादच्या डॉक्टरचा ड्युटीदरम्यान हृदयविकाराने मृत्यू
मुंबई, प्रतिनिधी, दि. 12 - कामाचा अतिरिक्त ताण, जेवणाच्या व झोपण्याच्या अनिश्चित वेळा यामुळे हृदयविकारामुळे डॉक्टरांचा मृत्यू होण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. औरंगाबाद येथे राहणार्या एका निवासी डॉक्टरचा ड्युटीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण असून या धावपळीत डॉक्टरांना स्वत:च्या आरोग्याकडेही फारसे लक्ष देता येत नाही.
त्यामुळे, राज्यातील विविध सरकारी व निम सरकारी रुग्णालयांत काम करणार्या निवासी डॉक्टरांची शारीरिक व मानसिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्स डॉक्टर (मार्ड)तर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापाठीकडे (एमयूएचएस) करण्यात येत आहे. जे. जे. रुग्णालयातून एमबीबीएस झालेल्या डॉ. अनिल पंपटवार यांनी औरंगाबाद येथून एम.डी.ची पदवी मिळवली होती. कामाच्या अति ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. झटका तीव्र स्वरूपाचा असल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याआधी त्यांना कोणताच त्रास नसल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वीच पंपटवार यांचे लग्न झाले होते. 2014 या वर्षात मुंबईतील केईएम रुग्णालयात तीन निवासी डॉक्टरांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मागील तीन वर्षात राज्यातील 90 निवासी डॉक्टरांना क्षयाची लागण झाली होती. त्यातील एका डॉक्टरचा मृत्यूही झाला होता. तर 100 डॉक्टरांना डेंग्यूची बाधा झाली होती. झोप व जेवण वेळेवर होत नसल्याने डॉक्टरांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होती. शिवाय, सतत रुग्णांच्या संपर्कात राहावे लागत असल्याने या आजारांची लागण त्यांना लगेच होते. त्यामुळे डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरता मार्ड संघटनेतर्फे एमयूएचएसकडे पत्राद्वारे मागणी करण्यात येत आहे, अशी माहिती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.