Breaking News

विकास आराखडा महापालिका निवडणुकीनंतर?



मुंबई, प्रतिनिधी, दि. 13 - मुंबईच्या पुढील 20 वर्षांच्या विकासाची दिशा ठरविणारा आराखडा 2017 मध्ये होणार्‍या महापालिका निवडणुकीनंतरच प्रत्यक्षात येणार आहे. बिल्डर लॉबीचा दबाव आणि विकास आराखड्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यास त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊन सत्ताधार्‍यांना त्याचा फटका बसू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन आराखडा धीम्या गतीने पूर्ण होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेने गेल्या वर्षी फेब्रुवारीत 2014 ते 2034 या 20 वर्षांचा विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. यामुळे हा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला होता. त्यानंतर चार महिन्यांत सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात दहा महिने उलटूनही पालिकेने या प्रक्रियेचा दुसराच टप्पा पार केला आहे. अद्याप एक टप्पा शिल्लक आहे. त्यानंतर अंतिम विकास आराखडा जाहीर केला जाईल. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. हा विकास आराखडा नागरिकांच्या पसंतीस न उतरल्यास त्याचा परिणाम महापालिका निवडणुकांवर होऊ शकतो. विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा केला जाण्याचीही शक्यता आहे. याबरोबरच बिल्डर लॉबीकडूनही विकास आराखडा लांबणीवर टाकण्यासाठी मंत्रालयात दबाव वाढत आहे. आराखडा लांबणीवर पडल्यास आरक्षण नसलेले भूखंड विकसित करणे त्यांना शक्य होणार आहे. रद्द झालेल्या विकास नियंत्रण नियमावलीतील शिफारशी कायम राहिल्यास बिल्डरांना मोफत चटईक्षेत्र निर्देशांक मिळणार नाही. या सर्व कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब लावला जात असल्याची चर्चा आहे.